Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

500 कोटींचा भ्रष्टाचार : शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त

500 कोटींचा भ्रष्टाचार : शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त

अहिल्यानगर : खरा पंचनामा

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारासोबत तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानंतर हा भ्रष्टाचार उघड झाला. शनी शिंगनापूर मंदिरातील गैरव्यवहाराबद्दल आमदार विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराचे ट्रस्ट बरखास्त करून शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर मंदिर विश्वस्त मंडळ तयार करण्यात येणार असल्याचे विधानसभेत जाहीर केले.

ट्रस्टच्या सदस्यांनी बनावट अॅप तयार करून त्याद्वारे भक्तांकडून पूजेसाठी देणग्या स्वीकारत होते. ट्रस्ट्रींनी असे तीन ते चार अॅप बनवले होते. या अॅपवर तब्बल तीन ते चार लाख भक्तांनी पैसे पाठवले होते, असे आमदार लंघे यांनी सांगितले. देवस्थानच्या रुग्णालयात तसेच मंदिरासाठी बोगस कर्मचारी भरती दाखवत त्यातूनही कोट्यावधी रुपये हडप करण्यात आले.

आमदार सुरेश धस यांनी देखील या विषयी प्रश्न उपस्थित करत बोगस कर्मचारी भरती दाखवत कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला.

ट्रस्टचे विश्वस्त दर आठवड्याला जमीनी घेत होते असा आरोप देखील धस यांनी केला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वस्तांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येणार असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, असे जाहीर करत विश्वस्त मंडळ बरखास्त केले.

बनावट अॅपच्या माध्यमातून भक्तांकडून पूजेच्या नावाखाली 1800 रुपये घेतले जात होते. तसेच इतर साहित्यासाठी वेगळे पैसे आकारले जात होते. बोगस कर्मचारी भरती दाखवून त्यांच्या नावाने पगार काढला जात होता. तब्बल 2447 कर्मचाऱ्यांनी देवस्थानकडून वेतन देण्यात येत असल्याचे सांगितले आले. मात्र, प्रत्यक्षात 250-275 कर्मचारी देवस्थान होते. देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात तेथे चार डॉक्टर आणि 9 कर्मचारी असल्याचे तपासणीत उघड झाले.

रुग्णालयाला बाग नसताना तेथे बाग असून तिच्या देखभालीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले. भक्त निवासात 109 खोल्या असताना तेथे 200 कर्मचारी कामाला असल्याचे दाखवण्यात आले असल्याची आकडेवारी देखील मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.