Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आता जगाच्या नकाशावर"

"छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आता जगाच्या नकाशावर"

मुंबई : खरा पंचनामा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानांकन मिळालं आहे. या किल्ल्यांच्या यादीत साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग तसेच तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केल्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

"सर्वात आधी जगभरातील शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो. हे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. खरं म्हणजे मोदींकडे सात वेगवेगळ्या संस्था गेल्या होत्या. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी त्यापैकी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले नामनिर्देशित करण्यासाठी प्रयत्न केले. यातील ११ किल्ले हे महाराष्ट्रात आहेत आणि एक किल्ला तमिळनाडूमध्ये आहे", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

"या १२ ही किल्ल्यांचं स्थापत्य कशा प्रकारे तयार करण्यात आलं? याच्या जागा कशा शोधण्यात आल्या? नैसर्गिक गोष्टीत कशा प्रकारे स्थापत्य तयार करण्यात आलं? कशा प्रकारे किल्ल्यांचे दरवाजे तयार करण्यात आले होते? अशा सर्व गोष्टी आपण युनेस्को समोर ठेवल्या. ही सर्व प्रक्रिया जवळपास एक वर्ष सुरु होती. त्यांच्या काही अधिकाऱ्यांनी किल्ल्यांना भेटी देखील दिल्या. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी मतदान करण्यासाठी २० देशांना मतदान करण्याचा अधिकार आहे. त्या देशांच्या अँबेसेटरबरोबर आम्ही संवाद साधला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि सचिवांनी देखील संवाद साधला. तसेच आम्ही यासाठी पंतप्रधान मोदींची भेट देखील घेतली होती", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

"तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून संबंधित २० देशांशी आम्ही संवाद साधला. मध्यंतरी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही युनेस्कोमध्ये भारताच्या बाजूने मतदान करू. २० ही देशांनी भारताच्या बाजूने मतदान केलं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले. हे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे जगाच्या नकाशावर आले आहेत. आता युनेस्कोच्या सर्व संकेतस्थळावर या किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती उपलब्ध होणार आहे. वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले येणार आहेत. तसेच युनेस्कोच्या माध्यमातून जागतिक वारसा स्थळ म्हणून सर्व माहिती देण्यात येणार आहे. या निर्मयामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.