Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

यंदा AI तंत्रज्ञानाद्वारे आषाढी वारीचा चोख पोलीस बंदोबस्त!कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती

यंदा AI तंत्रज्ञानाद्वारे आषाढी वारीचा चोख पोलीस बंदोबस्त!
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती

पंढरपूर : खरा पंचनामा

संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या पंढपुरात आषाढीनिमित्त लाखो भाविक दाखल झाले आहेत. सर्व भाविकांना सुखद दर्शन व्हावे तसेच ही वारी आरोग्यदायी, हरित, अपघातमुक्त व्हावी यासाठी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पोलीस बंदोबस्ताचे अनोखे नियोजन केले आहे. यावर्षी पहिल्यांदा AI तंत्रज्ञानाच्या सह्याय्याने पोलीस बंदोबस्त आणि भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महानिरीक्षक फुलारी यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिली.
मानाच्या पालख्या, भाविक पंढरपुरात पोहोचेपर्यंत त्यांना विविध सुविधा आणि पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी विशेष महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी दोन महिने आधीच तयारी सुरू केली होती. भाविकांना देणाऱ्या सूचनांचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. श्री. फुलारी यांनी केवळ पोलिस बंदोबस्ताकडे लक्ष न देता वारकऱ्यांच्या निवास, अपघात विमा, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा याकडे विशेष लक्ष दिले आहे. त्याशिवाय संपूर्ण वारी पार पडेपर्यंत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस अधिकारी, कमर्चारी यांच्या सोयी सुविधांकडेही विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार त्यांनी आधीच नियोजन केले होते.
पोलिस बंदोबस्ताशिवाय ड्रोन कॅमेरे, साध्या वेशातील पोलिसांचे माऊली पथक, बॉम्ब शोध नाशक पथके यांचा कडक वॉच आहे. या सर्व नियोजनावर श्री. फुलारी स्वतः लक्ष ठेऊन आहेत. त्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच अन्य व्हीआयपी लोकांच्या बंदोबस्तात कोठेही कसूर ठेवलेली नाही.
महिला भाविकांना त्रास होऊ नये म्हणून चंद्रभागातिरी चेंजिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. तेथे महिला पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. त्याशिवाय हिरकणी कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. तेथेही महिला पोलिस तैनात करण्यात आले होते. दर्शनावेळी कोठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी दर्शन रांगेतील नेहमीच्या बंदोबस्ताशिवाय २५० स्वयंसेवक आणि कमांडो तैनात करण्यात आले आहेत. भाविकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. भाविकांना क्लॉक रूमचीही व्यवस्था करून देण्यात आली आहे.

याशिवाय चंद्रभागा नदीत स्नानावेळी अनुचित घटना घडू नयेत यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. पंढरपूर परिसरात उभारलेली वाहनतळे, महामार्गवरील वाहतुकीचे नियोजन आरटीओ विभागाच्या साहाय्याने करण्यात आले आहे. शिवाय ड्रोन कॅमेरे, AI तंत्रज्ञान वापरून गर्दीची ठिकाणे पाहून जेथे जी आवश्यक उपाययोजना आहे ती करण्यात येत आहे.

महानिरीक्षक फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलिसांनी यंदा हरित वारी ही संकल्पना राबवली आहे. वारी आणि पालखी मार्गावर वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन पोलीस दलाकडून करण्यात येणार आहे. एकंदरीत श्री. फुलारी यांच्या कार्यकाळात यापूर्वी अपघातमुक्त आणि आरोग्यदायी वारी, आषाढी यात्रा यंदाही पार पडत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.