अन् सुप्रिया सुळेंनी ठाकरे कुटुंबाला एका फ्रेममध्ये आणलं!
मुंबई : खरा पंचनामा
राज्य सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय जल्लोष आज (दि.5) वरळीतील एन.एस.सी. आय. डोम सभागृहात संपन्न झाला.
या निमित्ताने तब्बल १९ वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाकरे कुटुंबाला एका फ्रेममध्ये आणत अनेकांच्या भावनेला हात घातला.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्या भाषनानंतर हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करणारे अन्य पक्षाच्या नेत्यांना देखील मंचावर आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर ठाकरेंची पुढची पीढी राज ठाकरे यांचे पुत्र अमित आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य मंचावर आले. ते मंचावर येताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्या जवळ आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याजवळ अमित ठाकरे यांना हाताला धरून फ्रेममध्ये आणले. या प्रसंगाला लोकांनी देखील जोरदार नारे देत प्रतिसाद दिला.
मेळाव्याच्या सुरूवातीला मंचावर दोनच खुर्य्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी उद्धव आणि राज ठाकरे हे १९ वर्षानंतर एकत्र आले. त्यानंतर मंचावर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एकत्र येत फोटोसाठी पोज दिली. यांच्यासह उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, सून मिताली बोर्डे यांनी एका फोटोत येत फोटो फ्रेम पूर्ण केली.
या विजयाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी संयुक्त सभेचे आयोजन केले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे एकत्र मंचावर उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. अनेक वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आणि 'मराठी मतांवर' हक्क सांगणारे दोन पक्ष मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही सभा म्हणजे सरकारला दिलेला एक इशारा आणि मराठी माणसाचा विजयोत्सव होता. या ठिकाणी दोन्ही पक्षांचे झेंडे एकत्र फडकत होते, जे मुंबईच्या राजकारणात सहसा पाहायला मिळत नाही. आदित्य आणि अमित ठाकरे यांचे एकत्र येणे, ही केवळ एका मुद्द्यापुरती एकजूट आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय बदलांची ही नांदी आहे, यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.