ट्रक, टेम्पो, टँकर संपावर; दूध, भाजीपाला, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबणार
मुंबई : खरा पंचनामा
विविध मागण्यांसाठी तसेच ई-चलन प्रणालीमार्फत केल्या जाणाऱ्या दंड वसुलीच्या निषेधार्थ राज्यातील अवजड वाहतूकदार संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. जाचक कारवाई तातडीने रोखण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही. वाहतुकीला 'ब्रेक' लागला असून दूध, भाजीपाला व इतर अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार आहे.
अवजड वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या आठवडय़ात बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी परिवहन विभागाला एक समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशाव्यतिरिक्त विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही. सरकारच्या या अनास्थेविरोधात अखेर मंगळवारी मध्यरात्रीपासून अवजड वाहतूकदारांनी बेमुदत संप सुरू केला. आमच्या प्रमुख चार मागण्यांबाबत सरकारने 15 दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने राज्यभरातील सर्व वाहतूकदार स्वेच्छेने आपली वाहने बंद ठेवणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले. सरकारने वाहतूकदारांच्या संपावर वेळीच तोडगा न काढल्यास अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊन सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 25 जुलैपर्यंत विचारविनिमय करू, तोपर्यंत संप मागे घ्या, असे आवाहन वाहतूकदारांना केले होते. मात्र याआधी दिलेल्या आश्वासनांची वेळीच पूर्तता केली नाही. त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतरही अवजड वाहतूकदार संपाच्या भूमिकेवर ठाम राहिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.