सांगलीत नर्सेसच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे सिव्हिलमधील रुग्णसेवा ठप्प
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, येथील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (मुख्यालय लातूर, शासनमान्य) शाखा सांगलीतर्फे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्याने परिचारिकांनी शुक्रवारीपासून (१८ जुलै) काम बंद आंदोलन सुरू केले असून, त्यामुळे रुग्णसेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
संपाच्या पहिल्याच दिवशी ओपीडी, वॉर्ड सेवा आणि उपचार प्रक्रियांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, रुग्णालय प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या आंदोलनात शाखा अध्यक्ष दत्ताराम ढमाले, ज्येष्ठ सल्लागार माया बुचडे, स्मिता काटवटे, नामदेव कणसे, रॉजर ओहोळ, सागर बुधगावकर, नवनाथ वडर, रफेल देवराज यांच्यासह मोठ्या संख्येने परिचारिका सहभागी झाल्या आहेत.
आंदोलकांनी केलेल्या मागण्या, वेतनातील त्रुटी दूर कराव्यात ,केंद्र शासनाच्या धर्तीवर सर्व भत्ते लागू करावेत, सरळ सेवा पदभरती व पदोन्नती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, कंत्राटी पद्धतीने भरती बंद करावी, परिचारिका वर्गासाठी स्वतंत्र संचालनालय व सुश्रुषा संचालक/सहसंचालक नेमावेत, अधिपरिचारक भरतीतील लिंगभेद संपवावा, नर्सिंग विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात वाढ करावी, बायोमेट्रिक हजेरीतून वगळावे, पाळणाघर उपलब्ध करून द्यावे, परीविक्षाधीन कालानंतर स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे, पदनाम बदल, निवास व्यवस्था अथवा भत्ता, सुरक्षा हमी यावर निर्णय घ्यावा. या मागण्या केंद्रस्थानी ठेवून संघटनेने मुंबईच्या आझाद मैदानात १५ व १६ जुलै रोजी धरणे आंदोलन, तर १७ जुलै रोजी एक दिवशीय काम बंद आंदोलन केले होते. मात्र सरकारने याची कोणतीही दखल न घेतल्याने अखेर बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना सांगली जिल्हा शाखा यांनी इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी शासनावर राहील.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.