Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन्स घेऊन येता का? रोहित पवारांविरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन्स घेऊन येता का? 
रोहित पवारांविरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर व्यक्त केलेल्या रोषाविरोधात पोलीस बॉईज संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आमदार रोहित पवार यांच्यावर 353 नुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली आहे.

राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन्स घेऊन येता का? असा सवाल राहुल दुबाले यांनी उपस्थित केलाय. शरद पवार कधीच कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला वाकड्या शब्दात बोलले नाही. मात्र रोहित पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. वारंवार पोलिसांना टारगेट केल्या जाणाऱ्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर पोलीस बॉईज संघटनेकडून निदर्शने केली जाणार असल्याची माहिती राहुल दुबाले यांनी दिली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंत पोहोचला. विधिमंडळात दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक खटके उडत असतानाच, गुरुवारी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या प्रकारानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनातून अटक केली.

देशमुख याच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आमदार रोहित पवार देखील आव्हाडांसोबत उपस्थित होते. आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर रोहित पवारही संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत रोहित पवार पोलिसांना म्हणाले की, "हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा. शहाणपण करू नका. हात खाली. सांगतोय तुम्हाला. नीट बोलता येत नसेल तर बोलायचं नाही. आमदाराला हात लावायचा नाही. हातवारे करू नका," असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनात गुंडानी हल्ला केल्यावर मकोकाचे आरोप असलेल्या गुंडांना अटक करायचे सोडून नितीन देशमुखलाच अटक केली. दोन महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर मारहाण झाल्याने त्यांची विचारपूस करण्याच्या अनुषंगाने नितीन देशमुख यांच्या भेटीची आम्ही मागणी केली असता पोलिसांनी चार पाच वेगवेगळया पोलीस स्टेशनला 3 ते 4 तास फेऱ्या मारायला लावत उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच आव्हाड साहेबांना देखील हातवारे करत अपमानस्पद वागणूक दिली.

पोलीस प्रशासन कायद्याने कारवाई करणार असेल तर सहकार्यच राहते. परंतु, काही पोलीस राजकीय आदेशाने वागणार असतील तर काय? दाद कुणाकडे मागायची? राजकीय आदेशाने वागणारे पोलीस लोकप्रतिनिधींना देखील जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील? ज्या आजीची जमीन हडपली गेली त्या आजीला, ज्ञानेश्वरी मुंडे, देशमुख कुटुंब, सूर्यवंशी कुटुंब यासारख्या असंख्य घटना आहेत जिथे सत्ताधारी लोकांवर आरोप आहेत, त्यांनी न्यायाची अपेक्षा करायची की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.