पोलीस काका, पोलीस दीदी संकल्पना प्रभावीपणे राबवणार
तंटामुक्त समित्या पुनःगठीत करू : पोलीस अधीक्षक संदीप घुगे
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात खून, खुनी हल्ले वाढले आहेत असे काहींना वाटते मात्र गतवर्षीच्या तुलनेत असे गुन्हे कमी झाले आहेत. तरुणीची छेडछाड, विनयभंग असे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस काका आणि पोलीस दीदी संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील गुन्हे कमी व्हावेत तसेच त्यांना प्रतिबंध करता येणे शक्य व्हावे यासाठी तंटामुक्त समित्या पुनःगठीत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधीक्षक घुगे म्हणाले, कौटुंबिक कारणातून होणारे गुन्हे रोखण्यासाठी तंटामुक्त समित्यांचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी त्या पुन्हा तयार करण्यात येणार असून नव्याने त्या जोरदारपणे काम करतील. शहरे तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालये यांच्या परिसरात मुली, तरुणी यांची छेडछाड, विनयभंग यासारखे गुन्हे तसेच गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस काका, पोलीस दीदी ही संकल्पना नव्याने प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.
मुली, तरुणीबाबत घडलेल्या गुन्ह्यात तातडीने तपास करून आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत त्यानुसार जिल्हा पोलीस दल कार्यरत आहे. सांगली, मिरज शहरात रिक्षा थांब्यांसाठी महापालिका प्रशासन जागा उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर या दोन्ही शहरातील वाहतुकीचे बरेच प्रश्न मार्गी लागतील असा विश्वासही अधीक्षक घुगे यांनी व्यक्त केला.
मिरजेत मोहरमनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पॅलेस्टाईनचे झेंडे फडकाविण्यात आले होते. तसेच इराणचे अली खोमेनिया यांचे फोटो एलईडीवर लावण्यात आले होते. ही मिरवणूक काढताना संबंधितांनी पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी तरुणांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोलिसांची करडी नजर असून धमकी देणारे, सामाजिक शांतता भंग करणारे स्टेटस, फोटो, रिल्स टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अधीक्षक घुगे यांनी यावेळी दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.