मुंडे-महाजनांमुळे भाजप सोडावा लागला
माजी मंत्री अण्णा डांगे यांची खंत
मुंबई : खरा पंचनामा
ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे माझी भाजपमध्ये छळवणूक झाली आणि पक्ष सोडावा लागला, अशी खंत माजी मंत्री अण्णा डांगे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.
डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी अतिशय परखडपणे आपली व्यथा मांडली. मी २३ मार्च २००२ रोजी भाजपचा राजीनामा दिला. ज्या व्यक्ती आज हयात नाहीत, त्यांच्याबद्दल बरेवाईट बोलणे बरे नाही. पण त्यावेळी पक्षात चुरस निर्माण झाली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांचे उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
तेव्हा त्यांनी सांगितलेल्या तीन-चार नावांमध्ये ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे नाव होते. त्यामुळे आता आपण पंतप्रधान होणार आणि मेहुणे गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे महाजन यांच्या डोक्यात शिरले. तेथून माझ्या छळवादाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार आल्यावर माझ्याकडे साधे खाते देण्यात आले होते. पण त्या खात्यात मी जे निर्णय घेतले, त्याची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली आणि त्यांनी माझ्याकडे ८-९ खात्यांचा कार्यभार सोपविला. मला राज्यात काम करण्याची संधी दिली आणि सुमारे १५ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी असलेले जलसंधारण खाते सोपविले आणि महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याची जबाबदारी दिली, असे डांगे यांनी सांगितले.
बाळासाहेबांनी माझ्यावर प्रेम केले, पण तेच मला नडले. बाळासाहेब माझ्या नावाचा पुढे वेगळा विचार करतील. पक्षातून माझ्याबद्दल सूचना आली, तर ती उचलून धरतील, अशी शक्यता मुंडे-महाजनांना वाटली. गोपीनाथ मुंडे व मी जिवाभावाचे व एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणारे मित्र होतो. पण नाईलाजाने पक्ष सोडावा लागला, अशी खंत डांगे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २३ वर्षे प्रचंड काम केले. पण त्याची दखल घेतली गेली नाही. मला पदाची अपेक्षा नव्हती. पण डांगे यांचे काय करणार, असा प्रश्न अध्यक्ष शरद पवार यांना विचारला असता 'आता त्यांच्यामागे कार्यकर्ते नाहीत, ताकद नाही,' असे उद्गार पवार यांनी काढले. त्यांचे वक्तव्य अंतःकरणाला भिडले व मी पक्षात निष्क्रिय झालो. आता मला भाजपमध्ये सांभाळून घ्यावे, अशी अपेक्षा डांगे यांनी व्यक्त केली. डांगे यांच्याबरोबर त्यांचे पुत्र ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.