Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : खरा पंचनामा

नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA), खडकवासला येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून, आज या प्रेरणादायी पुतळ्याचे लोकार्पण केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री मा. अमितभाई शाह यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा साम्राज्याचे महान सेनानी आणि नेतृत्वगुणांचा आदर्श असलेल्या थोरल्या बाजीरावांच्या शौर्याचा व इतिहासाचा गौरव करत, नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार मेधाताई कुलकर्णी, माजी खा. विनय सहस्रबुद्धे, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे साडेतेरा फूट उंचीचा हा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या निर्मितीसाठी चार हजार किलो ब्राँझचा वापर करण्यात आला असून, शिल्पकार विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले कि, मी पुण्याच्या भूमीत उभा आहे. सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळरात्री आशेचा किरण दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो. पुण्याची भूमी एक प्रकारे स्वराज्याच्या संस्काराची उगमस्थान आहे. 17 व्या शतकात या ठिकाणाहून स्वराज्याचा आलेख, तंजावूरपासून अटक ते अटक पासून कटक पर्यंत आला. इंग्रजांच्यासमोर स्वराज्यासाठी लढण्याची वेळ आली, तेव्हा सर्वात आधी सिंहगर्जना टिळकांनी केली. वीर सावरकरांनी याच महाराष्ट्राच्या भूमीतून उदहारण घालून दिलं. एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो हे सावरकर यांनी दाखवलं. एनडीएची मूळ स्थापना झाली असेल, तेव्हा काय विचार केला असेल. तेव्हा वातावरण चांगलं होतं. म्हणून एनडीए बनवली आहे. पण इंग्रजांना माहीत नाही की या ठिकाणी येणारं शतकभर भारताच्या सुरक्षेचं स्थान होईल. बाजीरावांचे पुतळे देशभरात आहेत. माझ्या गावात आहे. पण स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीएच आहे, असे शाह यांनी म्हटले. 

शाह पुढे म्हणाले, देशातील सैन्यात दाखल होणाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा ठिकाणी हा पुतळा आहे. प्रत्येकाला हा पुतळा प्रेरणा देईल आणि आणि दुश्मनांचं खात्मा करायला तयार असतील. युद्धात समर्पणाचा भाव आणि देशभक्तीचा आणि बलिदानाचा भाव सैन्याला विजय मिळवून देतो. 500 वर्षात या सगळ्या क्वॉलिटी बाजीराव पेशवे यांच्यात आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव यांचा जो इतिहास आहे तो छत्रपतींच्या स्वराज्याचा आणि साम्राज्याला विस्तारित करण्याचा इतिहास असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. 19 व्या विसाव्या वर्षी पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घ्यायची आणि 20-21 वर्ष नुसतं लढत राहायचं. 41 लढाया एकाही लढाईमध्ये पराजय आला नाही आणि मुघल असो, निजाम असो, पोर्तुगीज असो सर्व प्रकारच्या शत्रूला नामोहरम करण्याचं काम हे थोरले बाजीराव यांनी केलं, असे फडणवीस म्हणाले. पश्चिमेमध्ये त्यांचा बोलबाला होताच, दक्षिणेमध्ये देखील साम्राज्याचा विस्तार झाला आणि अगदी उत्तरेला काबुलमध्ये, त्यानंतर बंगालपर्यंत सगळं पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा त्याकाळच्या अखंड भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची स्थापना किंवा त्याचा विस्तार करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं. त्यांच्यावर अतिशय कमी वयामध्ये शाहू महाराजांनी जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम हे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केलेलं आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.