सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा
मुंबई : खरा पंचनामा
परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या कायद्याच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचा पुराव्यातून सिद्ध झालं आहे. त्यामुळं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ही केस लढत आहेत. दरम्यान, आज संध्याकाळी ५ वाजता आंबेडकर कोर्टाच्या या आदेशासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या याचिकेवर कोर्टात सुर्यवंशी यांची बाजू मांडली होती. हायकोर्टानं याप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळं आता सोमनाथच्या मृत्यूची जबाबदारी देखील निश्चित झाली आहे. त्यामुळं सोमनाथच्या कुटुंबियांच्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या लढ्याला यश आल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, २० डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळं झाला याची माहिती दिली होती. तुरुंगात सोमनाथला पोलिसांनी मारहाण केल्यामुळं त्याचा मृत्यू झाला का? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी दोनदा नाही असं उत्तर दिलं होतं. त्यांनी पुढे म्हटलं होतं की, सोमनाथ सुर्यवंशी हे न्यायालयीन कोठडीत असतानाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.
यात त्यांना कुठल्याही प्रकारे मारहाण झाल्याचं दिसत नाही. उलट त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता असा उल्लेख आहे. तसंच आधीच त्यांच्या शरिरावर काही जखमा होत्या, असंही या वैद्यकीय अहवालात म्हटलं आहे. मृत्यूच्या दिवशी सकाळी त्यांच्या छातीत जळजळत असल्याचा त्रास होत होता. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथेच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली होती. तसंच या मृत्यूप्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेशही त्यांनी दिले होते. पण सोमनाथच्या कुटुंबियांनी आणि आंबेडकरी चळवळीतील काही नेत्यांनी सुरुवातीपासून सातत्यानं आरोप केला की, सोमनाथला तुरुंगात पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंच त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळंच सोमनाथच्या आईनं सरकारनं जाहीर केलेली १० लाख रुपयांची मदतही नाकारली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.