भुईंज येथील दरोड्यातील संशयिताला थरारक पाठलाग करून पकडले
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे सराफ व्यापारांना मारहाण करून 20 लाखांची रोकड घेऊन पळून जाणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे थरारक पाठलाग करून पकडण्यात आले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
आज पहाटे पाचच्या सुमारास भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल पोपट हासबे (रा. हिवरे ता. खानापूर) या सराफ व्यापाऱ्याला व व त्याच्या साथीदाराला मारहाण करू वीस लाखांची रोकड आठ ते दहा जणांनी मारहाण करून लुटली होती. हे दरोडेखोर सांगलीच्या दिशेने गेल्याची माहिती सातारा पोलिसांनी सांगली पोलिसांना दिली होती. त्यांचा पाठलाग करत असताना एलसीबीचे उदय साळुंखे यांना माहिती मिळाली की या दरोडेखोरांच्या गाडीला योगेवाडी (ता. तासगाव) परिसरात अपघात झाल्याने गाडी सोडून दरोडेखोर डोंगरवाटेने पळून गेले आहेत.
सांगली एलसीबीच्या पथकाने स्थानिक लोकांच्या मदतीने शोध घेतला असता या दरोडेखोरांपैकी विनीत राधाकृष्णन (वय ३०, रा. पल्लाकड, केरळ) हा पोलिसांना सापडला. बाकीचे साथीदार पळून गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. हा विनीत राधाकृष्णन याच्यावर यापूर्वी दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली कार ताब्यात घेतली असून विनीत राधाकृष्णन याला भुईंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, उदय साळुंखे, सुशील मस्के, सतीश माने, सुनील जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.