आरोपीने सिगारेट ओढली.. पण शिक्षा तीन पोलिसांना झाली!
धुळे : खरा पंचनामा
न्यायालयात सुनावणीसाठी नेले जात असताना एका संशयित आरोपीने सिगारेट ओढली. मात्र त्याच्या या वर्तणुकीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या तीन अंमलदारांवर कारवाई झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या तिघांना तत्काळ निलंबित करत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आलेला आरोपी अकबर जलेला उर्फ अकबरअली कैसरअली शाह याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तो सध्या जिल्हा कारागृहात कोठडीत असून, मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात येणार होते. या कामासाठी पोलीस मुख्यालयातील अंमलदार राहुल जगताप, वसीम शेख आणि महेंद्र जाधव यांची देखरेखीच्या जबाबदारीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या तिघांच्या उपस्थितीतच आरोपी अकबरने सिगारेट ओढल्याची घटना घडली.
संशयित आरोपीच्या कृत्याकडे दुर्लक्ष केल्याने अंमलदार राहुल जगताप, वसीम शेख आणि महेंद्र जाधव तिघांना तडकाफडकी निलंबित करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले. आरोपींनी सिगारेट ओढली पण तीन पोलीस अमंलदारांना शिक्षा झाल्याने जिल्ह्यात या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली.
अकबर हा सिगारेट ओढत असतानाचे काही फोटो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला सिगारेट ओढण्यास परवानगी कशी मिळाली? हे प्रश्न उपस्थित झाले. संशयिताने पोलीस कोठडीत असताना सिगारेट ओढल्याची घटना आणि त्याचे छायाचित्र सार्वजनिक झाल्याने, पोलीस दलाची प्रतिमा मलीन होऊ शकते त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गंभीर दखल घेत तीनही पोलिस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.