लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन
मुंबई : खरा पंचनामा
लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. टिळक यांचे पार्थिव आज सकाळी 8 ते 11 या वेळेत पुण्यातील टिळकवाडा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, अंत्यसंस्कार दुपारी 12 नंतर वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहेत.
डॉ. दीपक टिळक यांनी टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेला. ते शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी संस्थेला नवा आयाम दिला. त्यांचे वडील जयंतराव टिळक हे गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते होते. हा लढ्याचा वसा डॉ. टिळक यांनी सांस्कृतिक आणि शैक्षणिक पातळीवर जोपासला.
साहित्य, भाषा आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी त्यांनी विविध संस्था आणि उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. तसेच, ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.