बेजबाबदार मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा
ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसात सत्ताधारी मंत्र्यांचे अत्यंत बेजबाबदार वर्तन सुरू आहे. यामुळे विधिमंडळाच्या पावित्र्याला धक्का लागत आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.
राजभवन येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्र्यांची यादीच जाहीर केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, हनी ट्रॅपशी संबंधित असणाऱ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. ज्या पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्यामध्ये प्रफुल लोढाची अटक झालेली आहे. मात्र, त्याच्याकडून अजून अनेक माहिती येणे बाकी आहे. कदाचित त्याच्या जीविताला सुद्धा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा विचार झाला पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार सुरू आहे. ज्या डान्सबारवर आतापर्यंत तब्बल तीन वेळा रेड पडली आहे, असा डान्सबार ज्याच्या नावे आहे तो माणूस गृह राज्यमंत्री पदावर कसा राहू शकेल? तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांनी डान्सबार बंद केले होते आणि हे नवे गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावे डान्सबार आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही.
माणिकराव कोकाटे सारख्या व्यक्तींनी ज्या पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य केली, तसेच विधिमंडळात रमी खेळले, हे अत्यंत वाईट आहे. त्यांच्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे. हॉटेल व्हिट्स आणि करोडो रुपयांच्या पैशांचा व्हिडिओ आणि सातत्याने उर्मटपणाचे वक्तव्य करणारे मंत्री संजय शिरसाट यांचे पायउतार होणे गरजेचे आहे. यासंदर्भात चर्चा झाली. योगेश कदम, संजय शिरसाट यांच्या बाबतचे अनेक कागदपत्र आणि पुरावे तसेच हनी ट्रॅपशी संबंधित काही पुरावे अनिल परब यांनी राज्यपाल यांना सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.