महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियन
मुंबई : खरा पंचनामा
महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय खेळाडू कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात होत असल्याने जेतेपदाची ट्रॉफी प्रथमच आपल्याकडे येईल हे निश्चित आहे.
दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीच्या दोन सामन्यांत १-१ अशी बरोबरी मिळवल्याने टाय ब्रेकरमध्ये मॅच गेली अन् पहिला टायब्रेकरही बरोबरीत सुटला. पांढऱ्या मोहऱ्यांसह हंपीकडे दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये वर्चस्व असेल असे वाटले होते, परंतु दिव्याने सर्वांना अचंबित करणाऱ्या चाली खेळल्या. वेळेचं गणित बसवताना हंपीला तारेवरची कसरत करावी लागली
३८ वर्षीय अनुभवी खेळाडू कोनेरू हंपी व १९ वर्षीय युवा खेळाडू दिव्या देशमुख यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाल्यामुळे टायब्रेकमध्ये लढत गेली. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दिव्याकडे अडव्हान्टेज असायला हवा होता. पण, अनुभवी हंपीने चांगली चाल खेळली. १९व्या चालीपर्यंत हंपीचे पटावर वर्चस्व पाहायला मिळाले. दिव्या थोडी दडपणाखाली दिसत होती. ३४व्या चालीत हंपीने हत्ती मारण्याच्या प्रयत्नात तिचा वजीर गमावला आणि सामन्याला अचानक कलाटणी मिळाली होती.
पण, हंपीकडे प्लॅन बी तयार होता आणि तिने त्यानुसार खेळ करताना दिव्याला तिच्या तालावर नाचवले. सततच्या त्याच त्याच चाली झाल्या आणि अखेर ८१व्या चालीनंतर सामना ड्रॉ सुटला. खरं तर पहिल्या टाय ब्रेकरमध्ये दोन्ही खेळाडूंनी संधी गमावली. ३८व्या चालीनंतर दिव्याला विजयाची संधी होती, परंतु तिच्याकडून चुका झाल्या आणि हंपीला नंतर नशिबाची साथ मिळाली.
दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये हंपी पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळली. सामना सुरू होण्यापूर्वी हंपी मेडिटेशन करताना दिसली आणि दिव्या तिच्याकडे पाहत होती. दिव्याच्या चेहऱ्यावर पहिल्या टायब्रेकरमध्ये गमावलेल्या संधीचं नैराश्य जाणवत होते. हंपीने कॅटलान ओपनिंगने डावाला सुरुवात केली. पण, दिव्या जलद चाली खेळताना दिसली आणि दोघींमध्ये पाच मिनिटांचा फरक जाणवत होता. हंमीने १० व ११ वी चाल खेळण्यासाठी बराच वेळ घेतला. आता दिव्याकडे अडव्हांटेज होता.
१८ चालीनंतर हंपीकडे फक्त चार मिनिटं शिल्लक होती आणि दिव्याकडे ११:३५ मिनिटं होती. त्यामुळे हंपी दडपणाखाली खेळताना दिसली आणि दिव्या तिच्याकडून चूकीची वाट पाहत होती. ४४व्या चालीत हंपीने तिरप्या रेषेवर वजीर ठेऊन दिव्याला चेक दिला. ४६व्या चातील दोघींनी एकमेकींचा वजीर मारला.
चार चालीनंतर दोघींनी हत्तीचे बलिदान दिले. ७५व्या चालीनंतर दिव्याने बाजी मारली आणि वर्ल्ड चॅम्पियन ठरली. १९ वर्षीय दिव्याला या विजयावर विश्वास बसेनासा झाला आणि तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.