एक फोन कॉल अन् धनखडांनी दिला राजीनामा; खळबळजनक रिपोर्ट...
दिल्ली : खरा पंचनामा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेला राजीनामा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी राजीनामा दिला.
प्रकृती अस्वास्थ्याचं कारण त्यांनी यासाठी दिले. परंतु, त्यांच्या राजीनाम्याची वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस नेते सुखदेव भगत यांनी सांगितले की राजीनाम्याची पटकथा आधीच लिहिली गेली होती. यामागची गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. धनखड यांना एक फोन कॉल आला होता. यानंतर जे काही घडलं ते सगळ्यांनीच पाहिलं असा दावा एनडीटीव्हीच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
खरंतर न्यायाधीश यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी एक प्रस्ताव आणला आहे. काही महिन्यांपूर्वी वर्मा यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली होती. सोमवारी ज्यावेळी पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली त्यावेळी विरोधी पक्षांतील खासदारांनी एक नोटीस दिली. उपसभापती धनखड यांनी ही नोटीस स्वीकारली. सभागृहाच्या महासचिवांना यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. रिपोर्टनुसार धनखड यांचा हा निर्णय केंद्र सरकारला योग्य वाटला नाही.
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकारकडून धनखड यांना फोन करण्यात आला होता. या संभाषणात सरकारने त्यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. यावर उपराष्ट्रपतींनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यामुळे संवादाचं रुपांतर वादात झालं. या दरम्यान उपराष्ट्रपतींनी आपल्या पदाच्या ताकदीचा हवाला दिला. या फोन कॉलनंतर धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची चर्चा सुरू झाली. याआधी सहा महिन्यांपूर्वी विरोधकांनी असाच अविश्वास प्रस्ताव धनखड यांच्या विरुद्ध आणला होता. धनखड यांना सरकारच्या या हालचालींचा सुगावा लागला आणि त्यांनी आधीच राजीनामा देऊन टाकला अशी चर्चा सुरू आहे.
मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने जस्टीस यशवंत वर्मा यांच्या विरोधात प्रस्ताव आणला होता. या दरम्यान सत्ताधारी गटातील 152 खासदारांनी महाभियोग प्रस्तावावर सह्या केल्या. तर दुसरीकडे राज्यसभेत विरोधकांनी एक प्रस्ताव आणला होता. यामध्ये 63 खासदारांनी जस्टीस वर्मा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता. जस्टीस वर्मा यांना हटवण्यासाठी सरकार आणि विरोधक दोघेही तयार असून त्यांच्यात आता क्रेडिट वॉर सुरू झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.