मारहाण संजय गायकवाडांनी केली, परवाना कॅन्टिनवाल्याचा रद्द झाला!
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आले आहेत. मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटिनमध्ये एका कर्मचाऱ्याला सर्वांसमोर बेदम मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
खुद्द मुख्यमंत्र्यांनीही मारहाण करणं चुकीचं असल्याचं नमूद केलं, मात्र आपण भूमिकेवर ठाम असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे संजय गायकवाडांवर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात असताना संबंधित कॅन्टिनचालकाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
मुंबईत सध्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार निवासात काही आमदारांचा मुक्काम आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आकाशवाणी आमदार निवासात मुक्कामाला आहेत. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टिनमधील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
जेवणाचा दर्जा चांगला नसल्याची संजय गायकवाड यांची प्रामुख्याने तक्रार होती. यासाठी चक्क डाळीची एक पिशवी घेऊनच संजय गायकवाड बनियन आणि टॉवेलवर कॅन्टिनमध्ये दाखल झाले आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारू लागले. एका कर्मचाऱ्याशी बोलता बोलता त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. संजय गायकवाड यांच्या या वर्तनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधकांनी अधिवेशनात केली.
दरम्यान, संजय गायकवाड यांच्यावरील कारवाईबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना संबंधित कॅन्टिन चालकाचा परवाना मात्र रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कॅन्टिनचालकाचा परवाना रद्द करण्याचे आदेश बुधवारी दिले. संजय गायकवाड यांनी कॅन्टिनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे या अन्नाचे नमुने बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
"तपास पथकानं पनीर, सॉस आणि डाळीसारख्या अन्नपदार्थांचे नमुने गोळा केले असून ते चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल १४ दिवसांत येतील", अशी माहिती एफडीएच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली होती.
दरम्यान, बुधवारी संध्याकाळपर्यंत एफडीएनं आकाशवाणी आमदार निवासात जेवणाची व्यवस्था पुरवणाऱ्या अजंता केटरर्सचा परवाना रद्द केल्याची नोटीस जारी केली. "तुमच्या व्यवस्थापनाला २६ जून २०२४ ते २७ सप्टेंबर २०२७ या काळासाठी दिलेला परवाना रद्द करण्यात येत आहे. तुम्ही किंवा तुमच्या वतीने कुणीही या काळात कोणत्याही प्रकारे अन्नपदार्थ खरेदी करणे, विकणे किंवा वितरीत करणे या प्रकारची कामे करू नये. जर असं काही आढळून आलं, तर तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल", असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.