प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणाचे विधानसभेत पडसाद
मुंबई : खरा पंचनामा
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासण्यात आल्याची घटना रविवारी (14 जुलै) अक्कलकोट येथे घडली. प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे फासत, त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांना अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
विधानसभेत सोमवारी (14 जुलै) विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे आमदार विजया वडेट्टीवार यांनी प्रवीण गायकवाड यांना मारण्याचा उद्देश होता, असा दावा सभागृहात केला आहे. तसेच, हल्ला करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष का झाले? असा सवाल त्यांनी यावेळी सभागृहात केला. हल्ला प्रकरणावर सखोल चौकशीसह मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. "कोणतेही कारण नसताना प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला. असे कार्यक्रम होत असताना त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त का नव्हता?" असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. "प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यासंदर्भात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे." अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली की, "मी स्वतः या प्रकरणाची संम्पूर्ण माहिती घेतली आहे. 'तुम्ही संभाजी नाव का ठेवले? छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवले? अशा वादातून ही शाईफेक त्यांच्यावर करण्यात आली आहे. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी प्रवीण गायकवाड यांना विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्यावी. पण ते फिर्याद द्यायला तयार नव्हते. तरीही पोलिसांनी फिर्याद घेतली आणि त्याठिकाणी आरोपींना अटक केली. अद्यापही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. जी घटना घडली आहे, त्यानुसार त्यांच्यावर कलम लावून त्यांना शिक्षा करण्यात येईल. त्यांच्यावर योग्य ती कारवाई आमच्याकडून करण्यात येईल." असे स्पष्ट केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.