Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खडकवासला EVM पडताळणीत नवा वाद'मूळ मतं मोजा, मॉक पोल नको'; उमेदवाराच्या आक्षेपाने निवडणूक आयोग निरुत्तर

खडकवासला EVM पडताळणीत नवा वाद
'मूळ मतं मोजा, मॉक पोल नको'; उमेदवाराच्या आक्षेपाने निवडणूक आयोग निरुत्तर

पुणे : खरा पंचनामा

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दोन ईव्हीएम मशीनच्या पडताळणी प्रक्रियेत आज (दि.२५) मोठा गोंधळ उडाला. नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील शरद पवार गटाचे खडकवासला विधानसभेचे पराभूत उमेदवारदोडके यांनी निवडणूक आयोगाच्या पडताळणी पद्धतीवरच गंभीर आक्षेप घेतल्याने प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली.

"प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची आकडेवारी आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स मोजा, नवीन मॉक पोल नको," अशी ठाम भूमिका शरद पवार गटाचे नेते सचिन दोडके यांनी घेतल्याने उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी निरुत्तर झाले.

नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर, खडकवासला मतदारसंघातील दोन ईव्हीएमची पडताळणी आज (दि.२५) केली जात होती. मात्र, या पडताळणीतील मुख्य वाद मतमोजणी पद्धतीवरून सुरू झाला. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ईव्हीएममध्ये नोंद झालेली मते आणि व्हीव्हीपॅटमधील स्लिप्स यांची मोजणी करून पडताळणी करावी, अशी मागणी सचिन दोडके यांनी केली. आम्ही आज या दोन मशीनवर नव्याने १४०० मते नोंदवून (मॉक पोल) त्या मतांची आणि व्हीव्हीपॅट स्लिप्सची पडताळणी करू. मूळ मतदानाचा डेटा तपासला जाणार नाही, असा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव होता. आयोगाच्या या भूमिकेमुळे सचिन दोडके यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. "मूळ मतदानाची आकडेवारी तपासली जात नसेल, तर या पडताळणीला काहीही अर्थ नाही," असे म्हणत त्यांनी प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. दोडकेंच्या या थेट प्रश्नांवर उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी निरुत्तर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या गोंधळानंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, "आयोगाच्या नियमांनुसारच आम्ही आज या दोन ईव्हीएम मशीनमध्ये १४०० मते नोंदवून, उमेदवारांना मिळालेले मतदान आणि व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करणार आहोत." यावर दोडके यांनी प्रतिप्रश्न केला की, "विधानसभा निकालाच्या दिवशी तुम्ही पाच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्लिपची खातरजमा केली होती. मग आज त्याच पद्धतीने या दोन ईव्हीएममधील मूळ आकडेवारी आणि व्हीव्हीपॅटमधील स्लिपची पडताळणी का केली जात नाही?" या प्रश्नावर मात्र आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले.

ज्या पराभूत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली, त्यांच्या मतदारसंघातील पडताळणी थांबली आहे. मात्र, दोडके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली नसल्याने त्यांच्या मतदारसंघातील ईव्हीएमची पडताळणी होत होती, जी आता या नव्या वादामुळे थांबली आहे. या प्रकरणामुळे ईव्हीएमच्या पडताळणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.