४० तास वाहतूक कोंडी, तिघांचा मृत्यू
NHAI म्हणाले, कामाशिवाय घरातून लवकर का निघता?
इंदोर : खरा पंचनामा
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये शुक्रवारी इंदौर देवास रोडवर तब्बल ४० तास वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत अडकल्यानं तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघांना हृदयविकाराचा झटका तर एका रुग्णाचा रुग्णालयात पोहोचण्याआधी ऑक्सिजन संपल्यानं मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुनावणीवेळी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं धक्कादायक असा युक्तिवाद उच्च न्यायालयात केला.
वाहतूक कोंडीमुळे तिघांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार आणि एनएचएआयला नोटीस जारी केली होती. ही नोटीस उच्च न्यायालयाच्या इंदौर पीठाने नोटीस बजावली होती. या प्रकरणी सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने सरकारला आणि एनएचएआयला फटकारलं.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने त्यांची बाजू मांडताना म्हटलं की, महामार्गावर झालेल्या मृत्यूबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. कामाशिवाय लोक इतक्या लवकर घरातून निघतातच का? असा प्रश्न एनएचएआयने उपस्थित केला. या प्रश्नावर न्यायालयात सगळेच आश्चर्यचकित झाले.
एनएचएआयने वाहतूक कोंडीसाठी १० दिवसांच्या क्रशर युनिटच्या संपाला जबाबदार ठरवलं आहे. कोर्टाने म्हटलं की, रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी तीन ते चार महिन्याचा वेळ मागितला होता. याआधीही जेव्हा प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं तेव्हा रस्ता दुरुस्त करण्याचा आदेश दिला होता. पण ७महिन्यानंतरही रस्ता तसाच असल्यानं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याचं काम अर्धवट असल्यानं महामार्गावर ४० तासापर्यंत वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत अडकल्यानं तिघांचा मृत्यू झाला. यात इंदौरमधील कमल पांचाल, शुजालपूरच्या बलराम पटेल आणि गारी पिपल्या इथल्या संदीप पटेल यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.