कोल्हापुरात ध्वनीक्षेपकावरून दोन गटात राडा; पोलिसांसह 10 जण जखमी
कोल्हापूर : खरा पंचनामा
शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर राजेबागस्वार भागात झालेल्या दंगलसदृश गोंधळाची खळबळजनक घटना उघड झाली आहे. एका मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या ध्वनीक्षेपकावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले. रात्री उशिरा एक जमाव या परिसरात घुसला व दगडफेक, वाहनांची तोडफोड केली. यावेळी दोन पेट्रोल बॉम्ब फेकल्याचीही माहिती समोर आली आहे.
या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक घराबाहेर पडले व जमावाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरदेखील हल्ला झाला. यात काही पोलीस आणि नागरिक असे मिळून दहा जण जखमी झाल्याचे कळते.
माहितीनुसार, भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा वर्धापनदिन शुक्रवारी साजरा होत होता. त्यावेळी लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून दुपारी वाद झाला होता. रात्री उशिरा याच वादाचे रूपांतर दोन गटांतील संघर्षात झाले. सिद्धार्थनगर परिसरात दगडफेक, तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशिरापर्यंत दोन्ही बाजूंकडून आक्रमकता दिसून येत होती.
सिद्धार्थनगरमधील स्वागत कमानीजवळ लावलेल्या साऊंड सिस्टीममुळे संपूर्ण रस्ता अडवला गेला होता. यावरून स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी साऊंड बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास तरुणांचा जमाव सिद्धार्थनगरात शिरला. त्यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली. काही मालवाहतूक रिक्षा व टेम्पो उलटवून त्यात पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. सुरुवातीला कोणीही काय घडत आहे हे समजू शकले नाही. पण अचानक समोरून हल्ला होत असल्याचे कळताच स्थानिक महिला व युवक बाहेर आले आणि जमावाला आव्हान दिले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण कायम होते. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.