पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण प्रथमच काँग्रेस नेत्यांसोबत !
नांदेड : खरा पंचनामा
माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षातून बोहर पडल्यानंतर पहिल्यांदाच जुन्या सहकाऱ्यांसोबत एकाच व्यासपीठावर दिसले. जुने सहकारी भेटल्याने आनंद झाला, पण ही जिल्हा परिषदेसाठीची सेटींग नाही, अशी मिश्किल टिप्पणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.
राजकारणात पक्ष बदलले जातात, विषय बदलतात, संदर्भबदलतात, वैयक्तिक संबंधही बिघडतात, पण वसंतराव चव्हाण यांनी मात्र वैयक्तिक संबंधात कुठेही कटूता येऊ दिली नाही. मी आज भाजपत असलो तरी खासदार रवींद्र चव्हाण यांनी वैयक्तिक संबंध जोपासताना कुठेही पक्षीय दृष्टिकोन येऊ दिला नाही, असे म्हणत चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदनही केले.
नांदेड जिल्ह्याचे नेते माजी आमदार दिवंगत बळवंतराव चव्हाण आणि दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांचे नायगाव येथे झालेल्या अनावरण प्रसंगी भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे नेते एकत्र आले होते. अशोक चव्हाण यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तरीही काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला धूळ चारली होती.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विद्यमान हर्षवर्धन सपकाळ यांनी संधी मिळेल तेव्हा अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षामुळेच तुम्ही दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकलात, याची आठवण करून दिली. काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर अशोक चव्हाण आज पहिल्यांदा काँग्रेस नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर आले.
छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी अशोक चव्हाण यांच्या मनमोकळ्या गप्पाही झाल्या. व्यासपीठावर हे तिघे एकमेकांच्या शेजारीच बसले होते. दिवंगत माजी आमदार बळवंतराव चव्हाण आणि माजी खासदार वसंतराव चव्हाण यांचे राजकारण सर्वसमावेशक होते. मात्र, सध्याच्या राजकारणात एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केल्याशिवाय जमतच नाही. पण, आजोबा आणि वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या खासदार रवींद्र चव्हाण यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची पंरपरा जोपासल्याचे गौरवोद्गार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात काढले.
राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अशोक चव्हाण यांनी या कार्यक्रमाची आणि आपल्या हजेरीची चर्चा होणार हे ओळखले. त्यामुळे आपल्या भाषणात त्यांनी याबद्दल स्पष्टच सांगितले की काही जिल्हा परिषदेची सेटींग नाही. राजकारणात पक्ष बदलले जातात, विषय बदलतात, संदर्भ बदलतात, वैयक्तिक संबंधही बिघडतात, पण वसंतराव चव्हाण यांनी मात्र वैयक्तिक संबंधात कुठेही कटूता येऊ दिली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.