गिरीश महाजन यांची सीडी कोणाकडे?
एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
जळगाव : खरा पंचनामा
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. जळगावच्या जामनेरमध्ये भाजपच्या वतीनं एकनाथ खडसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन करण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांच्या अनेक सिड्या या प्रफुल लोढाकडे आहेत, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी खडसे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मला कशाला आंदोलन करून जोडे मारता गिरीश महाजन यांना जोडे मारा, प्रफुल लोढाला जोडे मारा. माझ्या विरोधात भाजपचे आंदोलन सुरू आहे, मी एका पदाधिकाऱ्याला विचारले काय रे कशाला आंदोलन केलं, तर तो मला म्हणाला वरून आदेश आलेत, म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केलं, असा खोचक टेला यावेळी खडसे यांनी लगावला आहे.
विषारी पिल्लांना मी मोठं केलं याचं मला दुःख वाटतं, मी कधीही माझ्या जावयाचं समर्थन केलं नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? मग तरीदेखील रुपाली चाकणकर या कोणत्या आधारावर बोलत आहेत, असा सवाल यावेळी खडसे यांनी केला आहे.
माझं नाव सतत का घेता, माझा जावई आहे तो. तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळतं का? तो दारू पितो का ते? फक्त राजकारणात नाथाभाऊंना बदनाम करून हनी ट्रॅपवरून लक्ष विचलित करणे हा उद्योग सध्या सुरू आहे. मात्र काहीही झालं तरी मी प्रफुल लोढाचा विषय सोडणार नाही, असा इशाराही खडसे यांनी दिला आहे.
खेवलकर प्रकरणात पुण्यातील पोलीस तोंडघशी पडले आहेत. लोढाकडे कोणत्या व्हिडीओ क्लिप आहेत त्या तपासा. कोणत्या मंत्र्याच्या सीडी आहेत ते तपासा, नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये 72 अधिकारी आणि चार मंत्री आहेत, याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.