Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांवर चाकू हल्ला केल्याने सराईत गुन्हेगाराचा एन्काउंटरसातारा पोलिसांची पुणे जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई

पोलिसांवर चाकू हल्ला केल्याने सराईत गुन्हेगाराचा एन्काउंटर
सातारा पोलिसांची पुणे जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर : खरा पंचनामा

कृष्णानगर येथे सकाळी फिरावयास गेलेल्या महिलांना कोयत्याचा धाक दाखवत लुटणाऱ्या लखन पोपट भोसले (वय ३२, रा. जयरामस्वामी-वडगाव, ता. खटाव) या सराईत गुन्हेगाराने शिक्रापूर (जि. पुणे) येथे शनिवारी सायंकाळी सातारा पोलिसांच्या पथकावर चाकू हल्ला केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ कारवाईत पोलिसांची गोळी लागल्याने लखन भोसलेचा मृत्यू झाला. लखन भोसले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरीसह इतर २२ गंभीर गुन्ह्यांची नोंद साताऱ्यासह परजिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत आहे. त्याच्यावर मोकांतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती.

कृष्णानगरच्या मेडिकल कॉलेज परिसरातील काही महिला गुरुवारी सकाळी फिरण्यासाठी गेल्या असताना, तीन जण दुचाकीवरून आले. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांनी दुचाकी थांबवत महिलांचा पाठलाग केला. यापैकी सोनाली दीपक लोंढे (वय २६, रा. कृष्णानगर) या पळताना ठेच लागून जमिनीवर पडल्या. संशयितांनी सोनाली यांच्या गळ्यास कोयता लावून सोन्याचे दागिने हिसकावले. या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहोचल्यानंतर सोनाली यांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांनी दिली.

याचदरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर प्रसारित झाले. याची दखल घेत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी तपासाच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेसह सातारा शहर पोलिसांना दिल्या होत्या. हा प्रकार घडल्यानंतर कोरेगाव, तसेच शाहूनगर परिसरातही तशाच घटनांचे सत्र सुरू झाले. एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे महिलांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेसह सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सुरू केला होता. माहिती संकलनादरम्यान लखन पोपट भोसले हा सराईत गुन्हेगार काही दिवसांपूर्वीच गंभीर गुन्ह्यांतून जामिनावर सुटल्याचे समोर आले. यानुसार पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधणे सुरू केले. शोधादरम्यान लखन भोसलेनेच साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याचे सबळ पुरावे पोलिसांना मिळत गेले.

पोलिसांनी कर्नाटकच्या सीमावर्ती भागासह इतर ठिकाणी त्याचा शोध केला. शोधादरम्यान एका महिलेची माहिती मिळाल्यावर पोलिसांना चौकशीअंती हे गुन्हे लखन भोसलेने केल्याचे आणि तो सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या शिक्रापूर ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समजले. यानुसार सातारा शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी शनिवारी त्याला पकडण्यासाठी त्याठिकाणी केले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने लखन भोसलेचा शनिवारी सायंकाळी मलठण फाटा परिसरात शोध सुरू केला. एका ठिकाणाहून सातारा, तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला पकडले. या वेळी त्याने सातारा शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुजित भोसले यांच्यावर चाकूहल्ला करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी लखन भोसलेसह त्याच्या सहकाऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्याकडून मोठा प्रतिकार झाल्यावर सातारा शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने स्वसंरक्षणासाठी शासकीय रिव्हॉल्व्हरमधून प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यामध्ये गोळी लागून लखन भोसले जखमी झाला. लखन जखमी झाल्याचे पाहून त्याच्या साथीदारांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी लखन भोसलेला उपचारासाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती लखन भोसलेला मृत घोषित केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.