'मत चोरी' प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांकडून मत चोरीच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहेत. देशभरातून अनेक मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील कथित घोळाची प्रकरणे विरोधकांकडून बाहेर काढली जात आहेत. प्रामुख्याने काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वाधिक आक्रमक असून ते सातत्याने आयोगावर निशाणा साधत आहे. आयोगानेही रविवारी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनीच पत्रकार परिषदेत राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील सात दिवसांत शपथपत्र सादर करा, अन्यथा देशाची माफी मागा, असे आव्हानही त्यांनी राहुल यांना दिले आहे. त्यानंतर आता विरोधक अधिकच आक्रमक झाले असून थेट ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केल्याचे समजते.
बिहारमधील मतदारयाद्यांची पुनर्पडताळणीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून संसद दणाणून सोडली जात आहे. त्यातच आता महाभियोगाचा मुद्दाही चर्चेला आला आहे. काँग्रेसचे खासदार सैय्यद नासीर हुसैन यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याबाबतच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली आहे.
हुसैन यांनी म्हटले की, या विषयावर अद्याप पक्षांतर्गत कुठलीही चर्चा झालेली नाही. पण गरज पडल्यास नियमांनुसार काँग्रेसकडून महाभियोग प्रस्ताव आणला जाऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानामुळे या चर्चेला आता जोर आला आहे. सध्या संसदेत न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधींकडून करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपावर भाष्य केले. ते म्हणाले, आयोगावरील लावण्यात आलेल्या मत चोरीचे खोटे आरोपांमुळे आयोग आणि मतदारही घाबरत नाहीत. मत चोरी हा शब्द म्हणजे संविधानाचा अपमान आहे. आयोगाकडून पक्षभेद केला जात नाही. सर्व पक्ष एकसारखेच असल्याचे ज्ञानेश कुमार म्हणाले होते.
दुसरीकडे राहुल गांधी यांनीही बिहारमध्ये आयोगावर यावरूनच गंभीर आरोप केले. मतदार अधिकार यात्रामध्ये बोलताना त्यांनी आयोग केवळ मलाच टार्गेट करत असल्याचा आरोप केला. भाजप नेत्यांना आयोग शपथपत्र सादर करायला सांगत नाही, असे राहुल म्हणाले. बिहारमध्ये सुरू करण्यात आलेल्या या यात्रेच्या माध्यमातून जवळपास २० जिल्ह्यांमध्ये जाऊन मत चोरीच्या मुद्दा मांडला जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.