महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूने महाराष्ट्र हादरला
अमरावती : खरा पंचनामा
शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजताचे सुमारास उघडकीस आली.
आशा राहुल धुळे-तायडे (वय 38, गुरुकृपा कॉलनी, वडाळी, अमरावती) असे मृत पोलिस महिलेचे नाव आहे. ही हत्या असावी असा संशय व्यक्त होत आहे. आशा यांचे पती राहुल धुळे हे राज्य राखीव पोलिस दल क्र. 9 मध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहेत. गेल्या 13 तारखेपासून आशा या रजेवर होत्या. त्यांना चौदा वर्षांचा एक मुलगा आणि सात वर्षांची एक मुलगी आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास त्या घरात एकट्या होत्या. पती, मुलगी व मुलगा बाहेर होते. मुलगा सायंकाळी सहा वाजता घरात जात असताना त्यांच्या घरातून दोन व्यक्ती बाहेर येत असल्याचे त्याला दिसून आले. यानंतर त्याने घरात प्रवेश केला असता त्याची आई बिछान्यावर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्याने आईला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु आईने प्रतिसाद दिला नाही.
घाबरलेल्या मुलाने तत्काळ वडिलांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रोशन शिरसाट व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. महिलेच्या गळ्यावर व्रण असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेमुळे गुरुकृपा कॉलनीसह शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.