कोल्हापुरात 18 ऑगस्टपासून खंडपीठाच्या कामकाजाला होणार सुरुवात
कोल्हापूर : खरा पंचनामा
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (खंडपीठ) कोल्हापुरात 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यान्वित होणार असल्याची बहुप्रतिक्षित घोषणा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी आज (शुक्रवार 1 ऑगस्ट 2025) एका अधिसूचनेद्वारे केली. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेली अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी तीव्र मागणी जोर धरत होती. सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मुंबई गाठावी लागत होती. यात वेळ, पैसा आणि श्रमाचा प्रचंड अपव्यय होत असे.
अनेकदा केवळ तारखांसाठी मुंबईला जावे लागत असल्याने पक्षकारांचे मोठे हाल होत होते. या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह विविध सामाजिक संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे आणि शासनाकडे अथक पाठपुरावा केला होता. या सर्व प्रयत्नांना आणि संघर्षाला आज यश आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे कामकाज सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून अधिकृतपणे सुरू होईल. दरम्यान, या खंडपीठाच्या कार्यकक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे चालवली जातील. सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यकतेनुसार न्यायाधीश आणि कर्मचारी वर्ग येथे कार्यरत असेल. कामकाजाच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात आली असल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.