Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वकील मारहाण प्रकरणी सांगली पोलिसांवर उच्च न्यायालयाची तीव्र नाराजीउद्या डीव्हीआर हजर करण्याचे पोलिसांना आदेश

वकील मारहाण प्रकरणी सांगली पोलिसांवर उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
उद्या डीव्हीआर हजर करण्याचे पोलिसांना आदेश 

मुंबई : खरा पंचनामा

विटा येथील वकील विशाल कुंभार यांना मारहाण करून घरातील डीव्हीआर जबरदस्तीने नेल्याबद्दल वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विशाल कुंभार यांच्या घरातून जबरदस्तीने नेलेला डीव्हीआर उद्याच्या उद्या म्हणजेच बुधवारी कोणतीही छेडछाड न करता जशाच्या तसा उच्च न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयात वकील संघटनेतर्फे ॲड.अनिकेत निकम व ॲड. सुदत्त पाटील हे काम बघत आहेत. 

काही दिवसांपूर्वी विटा येथील ॲड. विशाल  कुंभार यांच्या घराजवळ एक तडीपार गुंड राहत असल्याच्या कारणावरून ८ ते १० पोलीस रात्री उशिरा कुंभार यांच्या घराजवळ जाऊन मोठमोठ्याने दंगा करणे, सेल्फी काढणे असे कृत्य करत होते, असे तेथील लोकांचे म्हणणे होते. याबाबतची तक्रार कुंभार यांनी अनेक वेळा केली होती. त्याचा राग मनात धरून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन वेळी एक फौजदार व सुमारे आठ पोलिसांनी कुंभार यांना अंगावरील कपड्यातच घरातून उचलून नेऊन, उघड्या पोलीस गाडीत घालून शिवीगाळ करून फरफटकत पोलीस ठाण्यात नेले व ॲड. विशाल कुंभार याच्या घरातून जबरदस्तीने पोलिसांनी सिसिटीव्ही चा डीव्हीआर जबरदस्तीने नेला असा आरोप झाला होता. 

याबाबत जिल्हापोलीस प्रमुख संदीप घुगे यांना वकील संघटनेने निवेदन देऊनही घुगे यांनी याबाबत तात्काळ संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यास तत्परता न दाखवता चौकशी करून चौकशीत दोषी आढळले तर संबंधित पोलिसांवर कारवाई करतो असे उडवा उडवीचे उत्तर दिल्याने वकील संघटना आक्रमक झाल्या व संघटनेतर्फे पोलिसां विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्यात आली आहे. 

याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्यापुढे चालू आहे. सुनावणी वेळी पोलिसांतर्फे बाजू मांडताना सरकारी वकील गावंड म्हणाले तक्रारीत उल्लेख केलेला पोलीस तिथे नव्हताच असे म्हटले. यावर वकिलांतर्फे बाजू मांडताना ॲड. अनिकेत निकम यांनी म्हटले की, पोलिसांनी वकील कुंभार यांच्यावर लगेच अदखलपात्र गुन्हा दाखल केला मात्र पोलिसांनी केलेला गुन्हा दखलपात्र असताना सिसिटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतानाही वकिलांनी पोलिसांविरुद्ध तक्रार केलेला गुन्हा दाखल करून घेतला नाही व मानवी अधिकारांच उल्लंघन करून वकिलांना वागणूक दिली. तसेच डीव्हीआर कुंभार यांच्या घरातून जबरदस्तीने नेऊन कुंभार यांना त्यांच्या मोबाईल मधील चित्रीकरण डिलिट करायला लावले. जेव्हा कायदा म्हणतो की दखलपात्र गुन्हा केलेला स्पष्ट होतं असेल तर दखलपात्र गुन्हा दाखल केला पाहिजे. यावर न्यायालयाने खाकी गणवेश घातला की तुम्हाला सुपर पॉवर येते का अशी टिप्पणी केली. 

या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाने पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून ॲड. विशाल कुंभार याच्या घरातून नेलेला डीव्हीआर कोणतीही छेडछाड न करता जशाच्या तसा  उद्याच्या उद्या म्हणजेच बुधवारी उच्च न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारची छेडछाड आढळली तर कारवाईचे संकेतही दिले आहेत. या प्रकरणाबाबत वकिलांच्यात संतापाची लाट उसळली असून सर्व वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

वकील संघटनेतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.  विजय जाधव, ॲड. विशाल कुंभार, ॲड.  सचिन जाधव,ॲड. प्रमोद सुतार, ॲड. देसाई व इतर वकील मुंबईला गेले आहेत. पुढील सुनावणी उद्या बुधवारी चालू राहणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.