भर न्यायालयात गुंडाची पोलिसाला मारहाण, गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी (8 ऑगस्ट) दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. मोका कायद्यांतर्गत कारागृहात असलेल्या अजय ठाकूर या कुख्यात गुंडाने न्यायालयात पोलिसासोबत धक्कादायक गैरवर्तन करत थेट पोलिसाच्या छाताडात लाथ घातली.
या प्रकारामुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे. वेदांतनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोलिसावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी अजय ठाकूर आणि त्याची पत्नी राणी यांना जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. मात्र, कोर्टातील क्लर्क सुट्टीवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि 21 ऑगस्ट रोजी पुढील तारीख देण्यात आली.
यानंतर आरोपींना पुन्हा हर्मूल कारागृहात नेण्याची प्रक्रिया सुरू असताना अजय ठाकूरने पोलिसांना सहकार्य करण्यास नकार दिला. 'माझे वकील आणि नातेवाईक येणार आहेत, मी अजून कोर्टातच थांबणार' असे म्हणत त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. सहायक फौजदार अमरसिंग ठाकूर यांनी त्याला नियम समजावून सांगितले, मात्र अचानक अजयने संतापून थेट अमरसिंग ठाकूर यांच्या छाताडात लाथ मारली आणि कोर्टातच गोंधळ माजवला.
अजय ठाकूर व त्याची पत्नी फेब्रुवारीपासून अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तुरुंगात आहेत. दोघांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई झाली असून अजयवर सिडको, सातारा, मुकुंदवाडी, जिन्सी, क्रांती चौक आदी पोलीस ठाण्यांत पोक्सोसह तब्बल 38 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.