Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने या सर्व २९ महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवली आहे.

यामुळे, गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका लवकरच पार पडणार हे निश्चित झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा आणि प्रभाग रचनेचा तिढा सुटल्यानंतर सरकारने निवडणुकांच्या तयारीला गती दिली आहे. निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना लवकरच जाहीर केली जाईल. त्यानंतर नागरिकांकडून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील. लोकांच्या सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, २५ ऑगस्टपूर्वी कोणत्याही क्षणी ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. यानंतर, सप्टेंबरमध्ये अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रभागांमधील आरक्षणाची सोडत काढली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकांचा बिगुल वाजेल. सध्याच्या अंदाजानुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारी २०२६ मध्ये या २९ महानगरपालिकांमध्ये नवे महापौर विराजमान होण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे २०२१ पासून प्रलंबित आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ४ आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना आणि ४ महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार, राज्य सरकारने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. प्रारूप प्रभाग रचना आयोगाकडे सादर करणे हे याच कार्यवाहीचा भाग आहे. निवडणूक आयोग लवकरच प्रारूप प्रभाग रचना जाहीर करेल. त्यावर हरकती-सूचना घेण्यासाठी साधारण १५ दिवसांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर १० दिवसांत अंतिम प्रभाग रचना जाहीर होऊन निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाईल. यामुळे, राजकीय पक्षांच्या आणि निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.