निरोप समारंभावेळी सरकारी खुर्चीवर बसून गाणे गाणं अधिकाऱ्याला भोवलं
तहसीलदारावर निलंबनाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
शासकीय अधिकाऱ्याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असावी. निरोपाच्या कार्यक्रमात तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणे गाण्याचा मोह एका तहसीलदाराला चांगलाच अंगलट आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने दखल घेत संबंधित तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. विभागीय आयुक्तांनी मंत्र्यांच्या आदेशानंतर थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या अभूतपूर्व कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रशांत थोरात हे पूर्वी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे झाली होती. उमरी येथील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यासाठी एका निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, थोरात यांनी उमरीच्या तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून एका हिंदी गाण्यावर सूर आळवला. उपस्थित सहकाऱ्यांपैकी कोणीतरी याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. एका जबाबदार पदावरील अधिकाऱ्याने खुर्चीवर बसून अशाप्रकारे गाणे गाणे हे शासकीय पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. या प्रकारामुळे शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याची गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
प्रशांत थोरात यांची नांदेडच्या उमरी तालुक्यातून लातूरच्या रेणापूर येथे २९ जुलै रोजी तहसीलदार म्हणून बदली झाली. थोरात यांना उमरी येथील पदावरून ३० जुलै रोजी कार्यमुक्त करण्यात आले. उमरी येथे थोरात यांच्यासाठी ८ ऑगस्टला निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले, जिथे त्यांनी खुर्चीवर बसून गाणे गायले. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर विभागीय आयुक्तांनी प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.