सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी थेट न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल
बीड : खरा पंचनामा
एका सरकारी वकिलाने वडवणी न्यायालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता या प्रकरणाला बीड जिल्ह्यात वेगळी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात थेट न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वी साताऱ्यात एका न्यायाधीशावर लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता वडवणीतील प्रकरणाने न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दोन दिवसांपूर्वी वडवणी कोर्टात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी सत्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या शालीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
पोलिसांना त्यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली. या नोटच्या आधारे आणि चंदेल यांचा मुलगा विश्वजीत याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात न्यायाधीश शेख आणि एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायाधीश शेख आणि संबंधित कर्मचाऱ्याकडून चंदेल यांना मानसिक त्रास दिला जात होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेनंतर न्यायाधीश रफिक शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपी न्यायाधीश व संबंधित कर्मचाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.
एका न्यायाधीशावरच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होण्याची ही घटना अभूतपूर्व मानली जात आहे. यामुळे न्यायालयीन वर्तुळात आणि समाजात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच खरे सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.