इचलकरंजीत भर गर्दीत बर्निंग कारचा थरार!
जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
इचलकरंजी : खरा पंचनामा
शहरात उद्या गणपतींचे आगमन होत असल्याने शहरातील रस्त्यावर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या रस्त्यात बर्निंग कारचा थरार इचलकरंजीकरानी अनुभवला. त्याचवेळी इचलकरंजी वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार या जिगरबाज अधिकाऱ्याने जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत आग विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मंगळवारी (दि. 26) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास प्रांत कार्यालय चौकात उभी असलेली एक सीएनजी कारने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने संपूर्ण कारला वेढले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जीवाची पर्वा न करता त्यांनी अग्निशमन फायर सिलेंडरच्या साहाय्याने काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. परंतु तातडीने उपाययोजना करून केवळ पंधरा मिनिटांत वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. कार जळाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांत भीतीचे वातावरण होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या धाडसी कृतीचे कौतुक केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या वेळी वेळ न दवडता दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळल्याची भावना इचलकरंजीकर व्यक्त करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.