Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळावे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळावे 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

सांगली : खरा पंचनामा

महाराष्ट्र शासन कृषि विभाग (कोल्हापूर विभाग) आणि स्व. संभाजीराव पाटील (बापू) प्रतिष्ठान, तांबवे यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ नाका, इंदिरा पॅलेस, वाघवाडी फाटा येथे आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शेती उत्पादन वाढ व शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. या अनुषंगाने आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती या विषयावरील कृषि विभागाने आयोजीत केलेला शेतकरी परिसंवाद शेतकऱ्याच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल. या परिसंवादात वक्त्यांनी सुलभ भाषेत हे तंत्रज्ञान उलगडून सांगावे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. 

इंदिरा पॅलेस, वाघवाडी फाटा येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, सेवानिवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उमेशचंद्र सारंगी, माजी अपर मुख्य सचिव (कृषि) नानासाहेब पाटील, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, युवा संशोधक सारंग नेरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमण डांगे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतीचे उत्पादन व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन स्तरावर अनेक अनुदान योजना आहेत. शेतकऱ्यांनीही शेतीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योग करणे ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीने वाटचाल करावी. शेतकऱ्यांचे उत्पादन, उत्पन्न वाढावे, शेतमालास चांगला भाव मिळावा, यासाठी ठिबक सिंचन, शेती व शेतीपूरक उद्योगांना अनुदान देण्याचे शासनाचे धोरण आहे. मक्यापासून 52 प्रकारची उपउत्पादने तयार करता येतात. अशाच पध्दतीने शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन करण्याबरोबरच नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. 10 ते 15 गावांचे गट करून तेथील प्रगतशील शेतकऱ्यांनी जगभरातील शेती व शेतीमधील बदलाचा, मागणीचा अभ्यास करावा व त्याची स्थानिक स्तरावर अंमलबजावणी करावी, असे ते यावेळी म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, शहरवाढीची मर्यादा लक्षात घेता, गावातच शेतीमध्ये काळानुरूप बदल करून शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे. नवीन पिके, उपउत्पादने, प्रक्रिया उद्योग यावर शेतकऱ्यांनी भर दिला तरच शेती फायदेशीर ठरेल. प्रक्रिया उद्योगाचे कारखाने खोलून इतरांनाही नोकऱ्या द्याव्यात, असे ते म्हणाले.

प्रास्ताविक नानासाहेब पाटील यांनी केले.  प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.