Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी अखेर एसआयटी स्थापन

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी अखेर एसआयटी स्थापन

मुंबई : खरा पंचनामा

परभणीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात अखेर विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.

या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी SIT ची अधिकृत घोषणा केली असून, यामध्ये परभणी जिल्ह्यातील एकाही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील आठवड्यात राज्य सरकारला निर्देश दिले होते की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात आठ दिवसांच्या आत एसआयटी स्थापन करण्यात यावी. या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी कारवाई करत स्वतंत्र तपास पथकाची स्थापना केली आहे.

SIT चे नेतृत्व सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. हिरेमठ हे सध्या पुणे सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत आणि नुकतेच सीबीआयमधून महाराष्ट्रात बदली होऊन आलेले अधिकारी आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास जबाबदारीने सोपवण्यात आला आहे.

SIT मध्ये सदस्य म्हणून नागपूर सीआयडीचे पोलीस अधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांची तसेच नांदेड सीआयडीचे पोलीस उप अधीक्षक अनिल गवाणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या तपास पथकात परभणी जिल्ह्यातील कोणताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी नसणार, असे स्पष्ट निर्देश राज्य पातळीवरून देण्यात आले आहेत.

या विशेष तपास पथकाच्या कार्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथील अपर पोलिस महासंचालक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राहणार आहे. त्यामुळे तपास अधिक उच्च पातळीवर आणि पारदर्शकतेने होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.