जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाचा नवा पॅटर्न
मुंबई : खरा पंचनामा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आरक्षण निश्चित करण्यासाठी आता नवीन नियमावली लागू झाली आहे. यामुळे, ज्या उमेदवारांनी मागील निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून तयारी सुरू केली आहे, त्यांची निराशा होऊ शकते.
यापुढे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मध्ये ज्यांची सर्वाधिक लोकसंख्या असेल अशा जागांपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने जागा आरक्षित केल्या जातील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी गट आणि गणांच्या आरक्षणाची प्रक्रिया नव्या नियमांनुसार केली जाणार आहे. त्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अद्याप आरक्षण सोडतीबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही; मात्र, त्या सूचना आल्यानंतर या नव्या नियमांनुसार ही प्रक्रिया राबवली जाईल.
हा नवा उतरता क्रम 2025 नंतर होणाऱ्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी लागू होईल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठी राखीव जागा निश्चित झाल्यानंतर, ज्या जागा पूर्वी ओबीसीसाठी (OBC) राखीव नव्हत्या, त्या जागांवर फिरत्या पद्धतीने ओबीसी आरक्षण दिले जाईल.
यापूर्वी 1996 च्या नियमावलीनुसार 1997 ते 2017 पर्यंत निवडणुकांचे आरक्षण निश्चित केले जात होते, पण आता तो नियम रद्द करण्यात आला आहे. आता 2011 च्या जनगणनेनुसार ज्या गट/गणात अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असेल, त्या जागांना प्राधान्य दिले जाईल आणि नंतर उतरत्या क्रमाने या जागा वाटून दिल्या जाणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.