ऑनलाईन अॅपवर नोंदणी केलेल्यांनाच मिळणार मंत्रालयात प्रवेश
मुंबई : खरा पंचनामा
मंत्रालयातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांसाठी चेहरा पडताळणी प्रणालीद्वारे प्रवेश अनिवार्य करण्यात आला. तरीदेखील, दुपारी दोननंतर मंत्रालयाबाहेरील प्रवेशखिडक्यांवर प्रवेशपत्र घेऊन आत जाणाऱ्यांची गर्दी काही कमी झाली नाही.
या गर्दीच्या लांबच लांब रांगा कधी एका प्रवेशद्वारापासून दुसऱ्यापर्यंत तर कधी थेट भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचत असल्याने आता प्रवेशपत्र वितरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑगस्टपासून 'डीजीप्रवेश' अॅपवर नोंदणी केलेल्यांनाच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी चेहरा पडताळणी प्रणाली बसविली आहे. तसेच 'डीजी' अॅपवर नोंदणी करून प्रवेशपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील किंवा गाव-खेड्यांमधून येणाऱ्या आणि अद्ययावत फोन नसलेल्या लोकांना प्रवेश मिळावा म्हणून खिडकीवरून प्रवेशपत्र देण्याची सोयही करण्यात आली होती. मात्र, 15 ऑगस्टपासून खिडकीवर प्रवेशपत्र देणे बंद होणार आहे. त्यानंतर अभ्यागतांना हे अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून, त्यात आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक व नोंदणी पूर्ण केल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.
'डीजी प्रवेश अॅप' सुरू होण्यापूर्वी मंत्रालयात प्रवेशासाठी लोकांना तासनतास रांगेत थांबावे लागे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात असे. मंत्री, आमदार, तसेच मंत्र्यांचे खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यकांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होत असे. विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी ही गर्दी आणखी वाढत असे. कित्येकदा ही रांग उद्यान प्रवेशद्वारापासून मुख्य प्रवेशद्वार ओलांडून थेट भाजप कार्यालयापर्यंत पोहोचत असे.
'डीजी प्रवेश अॅप' सुरू झाल्यानंतरही ही परिस्थिती फारशी बदलली नाही. त्यामुळेच 15 ऑगस्टपासून ऑफलाइन प्रवेश पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिली. तसेच, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, अशांसाठी कोणती प्रणाली आणि कार्यप्रणाली विकसित करायची यावर काम सुरू असून, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेतली जाईल, असेही निकम यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.