Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गणेशोत्सव, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मोडले गुन्हेगारांचे कंबरडेइस्लामपुरातील ज्ञानेश्वर पवारसह त्याच्या टोळीतील दहाजणांवर मोकाची कारवाई

गणेशोत्सव, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मोडले गुन्हेगारांचे कंबरडे
इस्लामपुरातील ज्ञानेश्वर पवारसह त्याच्या टोळीतील दहाजणांवर मोकाची कारवाई

सांगली : खरा पंचनामा
गणेशोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी कडक कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्लामपूर येथील विनोद माने याच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश पवार याच्यासह त्याच्या टोळीतील दहाजणांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सण आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईचा दणका देण्याचा इशारा या कारवाईतून महानिरीक्षक फुलारी यांनी दिला आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञानेश भिमराव पवार (वय २४), चेतन पांडुरंग पवार (वय २४), पंकज नामदेव मुळीक, प्रतिक उर्फ गणेश महादेव पालकर (वय २४), युवराज दयानंद कुंभार (वय २३), रोहन उर्फ वैभव सुभाष कांबळे (वय २४), किसन उर्फ सोन्या संजय कुचीवाले (वय १८), प्रथमेश संकाप्पा कुचीवाले, प्रेम उर्फ विश्वजित सुभाष मोरे, गुरुदत्त राजेंद्र सुतार (सर्व रा. इस्लामपूर) अशी मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ज्ञानेश्वर पवार आणि त्याच्या टोळीतील सदस्य इस्लामपूर शहर आणि परिसरात २०१८ पासून गुन्हेगारी कारवाया करत होते. इस्लामपूर शहरात टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी तसेच आर्थिक लाभासाठी खुनाचा प्रयत्न, घरफोडी, जबरी चोरी, मारहाण, खासगी सावकारी, अपहरण, दलितांच्या खुनाचा प्रयत्न, सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान, महिला, युवतींची छेडछाड असे गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.
या टोळीवर वारंवार कायदेशीर तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाचे अवलोकन करून अधीक्षक घुगे यांनी तो प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे पाठवला होता. शनिवारी महानिरीक्षक फुलारी यांनी या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
गणेशोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी इस्लामपूर येथील टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर नजर ठेवून या टोळ्या कायमच्या नष्ट करण्यात येतील. गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महानिरीक्षक फुलारी यांनी दिला आहे.
सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, इस्लामपूरचे निरीक्षक संजय हारूगडे, बसवराज शिरगुप्पी, दीपक गट्टे, गणेश झांजरे, अरूण कानडे, सुशांत बुचडे यांनी या कारवाईत भाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.