Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एकाही मराठा तरुणाला धक्का लागला, तर अख्खं राज्य बंद पाडू'

'एकाही मराठा तरुणाला धक्का लागला, तर अख्खं राज्य बंद पाडू'

परभणी : खरा पंचनामा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. येत्या २९ ऑगस्टला मुंबईत विराट मोर्चा काढण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.

सध्या मराठवाड्यात संवाद दौरा करत असताना परभणी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

परभणीतील एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना म्हटले की, 'देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाविरुद्ध षडयंत्र रचत आहेत.' काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी गोव्यात जाऊन ओबीसी नेत्यांची भेट घेतली आणि तिथेच मराठा आंदोलनादरम्यान राज्यात दंगल घडवण्याचा कट रचल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. 'याची कुणकुण मला लागली असून, जर फडणवीस यांनी असं काही करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद राहील,' असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला.

यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. 'तुम्ही ओबीसींसाठी लढणार असाल, तर मग मराठा समाजासाठी कोण लढणार? मराठ्यांनी तुम्हाला सत्तेत आणलं नाही का? हे विधान देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबद्दल किती द्वेष आहे हे दाखवून देते,' असेही ते म्हणाले. मुंबईतील मोर्चाबद्दल विचारले असता, फडणवीसांनी 'पोलीस बघून घेतील' असे उत्तर दिले होते. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, 'फडणवीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस असे समीकरण राज्यात तयार झाले आहे. मागच्या वेळी जसे हल्ले घडवून आणले, तसे आता पुन्हा होणार आहेत का?'

जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, 'मुंबईतील आंदोलनादरम्यान एकाही मराठा तरुणाला धक्का लागला, तर संपूर्ण राज्य बंद पाडण्यात येईल.'

'मी कोणत्याही दबावाखाली येत नाही, त्यामुळे माझ्यावर हल्ला करण्याचा फडणवीस यांचा कट आहे,' असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, २७ ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटी येथून निघतील. मराठा समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, 'यावेळी माघार घेणार नाही. आरक्षण घेऊनच परत येऊ आणि तेही ओबीसीतूनच घेऊ.'

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.