SIT चे पथक बीडमध्ये तळ ठोकून; भाऊ अन् वडिलांचा जबाब नोंदवला
बीड : खरा पंचनामा
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तपासाला आता वेग आला असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांकडून जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने महादेव मुंडे यांचे भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे.
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची भर चौकात हत्या करण्यात आली. ही घटना घडून बराच कालावधी उलटून गेला आहे. महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून अद्यापही त्यांचा मारेकरी पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. या घटनेचा तपास करण्यासाठी जुनी SIT काढून नवीन SIT पथक गठीत करण्यात आलं होत. नव्या एसआयटीचे प्रमुख आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली महादेव मुंडे यांचे भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांची सखोल चौकशी करण्यात आली.
ही कारवाई आंबेजोगाई येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात पार पडली. तब्बल दोन तास ही चौकशी चालली. चौकशीदरम्यान पोलीस निरीक्षक संतोष सावळे, निरीक्षक भार्गवकर आणि सपकाळ हे अधिकारीही उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, या चौकशीदरम्यान दोघांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात आणि तेच आरोपींपर्यंत पोहोचण्यास कळीची भूमिका बजावू शकतात. महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
या प्रकरणातील नेमका हेतू, गुन्ह्यातील संभाव्य सहभाग आणि मागील वैर यांचा तपास सध्या एसआयटी करत आहे. त्यामुळे या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या एसआयटीचे पथक आंबेजोगाईत तळ ठोकून असून, प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची बारकाईने तपासणी केली जात आहे. पुढील काही दिवसांत आणखी काही साक्षीदार आणि संशयितांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महादेव मुंडे यांची हत्या नेमकी कुणी, का केली याचा छडा लावण्यासाठी एसआयटीकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.