देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या येळावीतील तरुणाला अटक
दुचाकीसह 1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त : तासगाव पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
तासगाव तालुक्यातील पाचवा मैल ते निमणी रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या येळावी येथील तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतूस, एक दुचाकी असा 1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
सुशांत संजय चव्हाण (वय २१, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एस स्टॅन्डजवळ, येळावी, ता. तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बेकायदा घातक हत्यारे घेऊन फिरणाऱ्यांचा तासगाव पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण शाखा शोध घेत होती. शाखेतील अमित परीट, विवेक यादव यांना एक तरुण पाचवा मैल ते निमणी जाणाऱ्या रस्त्यावरील एका दुकानात देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने तेथे जाऊन चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस सापडले. शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याने त्याला अटक करून दुचाकी, पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले.
तासगावचे पोलीस उपाधीक्षक अशोक भवड, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजु अन्नछत्रे, अमित परीट, अमोल चव्हाण, सागर मगदुम, प्रशांत चव्हाण, विवेक यादव, विठ्ठल सानप, अमित पवार, अर्जुन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.