राज्यात मतदारांच्या संख्येत सात महिन्यांत 14 लाखांची नोंद
मुंबई : खरा पंचनामा
देशात गेल्या काही महिन्यांपासून वोट चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारांच्या संख्येत झालेल्या वाढीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आहे.
इतकेच नाही तर त्यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. देशात लोकसभा निवडणुका झाल्याच्या अवघ्या सहा महिन्यांमध्येच 40.81 लाख मतदारांची वाढ कशी झाली? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. याचे स्पष्टीकरण अद्यापही निवडणूक आयोगाकडून पूर्णतः देण्यात आलेले नाही. अशातच आता महाराष्ट्रात गेल्या सात महिन्यांमध्ये तब्बल 14 लाख नव्या मतदारांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुका होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पण या सात महिन्यांमध्येच राज्याच्या मतदारांमध्ये तब्बल 14.71 लाख मतदारांची भर पडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या मतदारवाढीचा परिणाम हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार आहे. कारण, आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत केलेली यादीच अंतिम मानण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी वापरण्याचा विचार होता. मात्र, आता 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत केलेली यादीच अंतिम मानण्यात येणार आहे. कारण मतदार नोंदणी ही एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता विरोधक या मतदारांच्या वाढीवर प्रश्न उपस्थित करणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
27 नोव्हेंबर 2024 ते 30 जून 2025 या कालावधीत राज्यातील मतदारांची संख्या 9,70,25,119 वरून 9,84,96,626 इतकी झाली आहे. म्हणजेच एकूण 18,80,553 नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. याचदरम्यान, 4,09,046 जुन्या मतदारांची नावे वगळण्यात आली असून, अंतिमतः एकूण 14,71,507 मतदारांची वाढ झालेली आहे. गेल्या निवडणुकांदरम्यान मतदार यादीतील आकडेवारीवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांनी मात्र या नवीन वाढीव मतदारांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली नाही. या नव्या मतदारांपैकी 1.96 लाख मतदार हे घरबदलामुळे म्हणजेच एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर झाल्यामुळे नव्याने नोंदले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक वाढ पुणे (32,031), ठाणे (27,386), आणि मुंबई उपनगर (25,831) या जिल्ह्यांमध्ये झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.