Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"तुमच्याकडे वेळ नसेल तर खुर्ची काढून घेतली जाईल"

"तुमच्याकडे वेळ नसेल तर खुर्ची काढून घेतली जाईल"

नागपूर : खरा पंचनामा

आपले काही पालकमंत्री फक्त शासकीय कार्यक्रमांनाच उपस्थित राहतात. ज्या शहरात जातात तेथील जिल्हाध्यक्षांकडे बघतसुद्धा नाहीत, पदाधिकाऱ्यांसोबत बोलत नाहीत. पक्षापेक्षा इतर कामांमध्येचे ते जास्त व्यस्त असतात. मात्र आता हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. तुमच्याकडे वेळ नसेल तर खुर्ची काढून घेतली जाईल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना बजावले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय चिंतन शिबिर नागपूरमध्ये आयोजित केले आहे. शिबिराच्या उ‌द्घाटन कार्यक्रमात बोलताना दादांनी कुणाचेही नाव न घेता उशिरा येणारे मंत्री, नेते तसेच नेमून दिलेल्या जिल्ह्यात फक्त झेंडावंदनासाठी जाणाऱ्या पालकमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले, आता परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडिया प्रचंड अॅक्टिव्ह झाला आहे. तुमच्या बारीकसारीक हालचालींवर सर्वांचे लक्ष असते. मागचे पुढचे संवाद काढून ट्रोल केले जाते. त्यामुळे बदललेल्या काळासोबत राष्ट्रवादी पक्ष म्हणून आपणही बदलले पाहिजे.

सर्वांची शिबिराची वेळ सकाळी साडेनऊ वाजताची दिली होती. याचे नियोजन आधीपासूनच केले होते. सर्वांना याची माहिती दिली होती. त्यानंतरही अनेक जण उशिरा आले. यापुढे बैठका घेताना वेळ संपल्याबरोबर आपण विमानप्रामाणे सभागृहाचे दरवाजे बंद केले पाहिजे असे गमतीने सांगताना त्यांनी लेटलतिफ नेत्यांना चांगलेच खडसावले.

पक्ष तुम्हाला वर्षातून एक दिवस मागतो. तोसुद्धा तुम्हाला देता येत नसेल तर हे बरोबर नाही. तुम्हाला नेमून दिलेल्या जिल्हे व तालुक्यांमध्ये जावेच लागले. पालकमंत्र्यांनी फक्त एक मे, 15 ऑगस्ट व 26 जानेवारीशिवाय जावे, तेथील आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करावी, लोकांमध्ये फिरावे. त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात असंही अजितदादांनी म्हटलं.

काही मंत्री जातात, मात्र तेथील जिल्हाध्यक्षांना विचारतसुद्धा नाही. ते सुद्धा आपल्याच परिवारातील घटक आहेत, असे करून चालणार नाही. आजवर ज्या चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त कराव्या लागतील. ज्यांना हे जमणार नाही, त्यांना खुर्ची रिकामी करावी लागेल, असा गर्भित इशाराही यावेळी दादांनी आपल्याच पक्षाच्या मंत्री अन् नेत्यांना दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.