कार, दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील 20 गुन्हे उघड
16.10 लाखांच्या 22 गाड्या जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कारसह दुचाकी चोरणाऱ्या जुळेवाडी (ता. तासगाव) येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील 20 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून 16.10 लाखांच्या 22 गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
फिरोज नबीलाल मुल्ला (वय ३१, रा. मानुगडे गल्ली, जुळेवाडी, ता. तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील मच्छिन्द्र बर्डे, सतीश माने यांना एक तरुण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी पाचवा मैल परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून फिरोज मुल्ला याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतल्यावर त्याच्या खिशात किल्ल्यांचा जुडगा सापडला त्याबाबत तसेच दुचाकीबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने ती दुचाकी कुपवाड येथून तर अन्य गाड्या कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून कारसह 19 दुचाकी असा 16.10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून सांगली जिल्ह्यातील कुपवाड, मिरज, इस्लामपूर, कासेगाव येथील 6, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, शाहूपुरी, गांधीनगर येथील 5, सातारा जिल्ह्यातील कराड येथील 1, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर शहरातील एकूण 7, कर्नाटकातील विजयपूर येथील एक असे 20 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याला कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, मच्छिद्र बर्डे, सतिश माने, सागर लवटे, नागेश खरात, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, संदीप गुरव, अनिल कोळेकर, अमर नरळे, उदयसिंह माळी, महादेव नागणे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, गणेश शिंदे, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.