धाराशिवमध्ये पाच कला केंद्रांवर पोलिसांची धाड
धाराशिव : खरा पंचनामा
धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्याबेकायदेशीर प्रकरणांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच कला केंद्रांवर धाड टाकली. या छापेमारीत नियमभंगाचे धक्कादायक प्रकार उघड झाले असून संबंधित केंद्रचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई मध्यरात्री बाराच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये धाराशिव तालुक्यातील आळणी येथील साई आणि पिंजरा या कला केंद्रांवर तर चोराखळी पाटी येथील गौरी, कालिका आणि महाकालिका या केंद्रांवर छापे टाकण्यात आले. याआधी याच चोराखळीतील महाकाली कला केंद्रात महिनाभरापूर्वी गोळीबाराची घटना देखील घडली होती. त्यामुळे हे कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कलाकेंद्रांवर छापे टाकले असून नियमानुसार कलाकारांसाठी स्टेजवर नृत्याची व्यवस्था करणे बंधनकारक असताना, या ठिकाणी बंद खोलीत रात्री उशिरापर्यंत नृत्य सुरू असल्याचे समोर आले. तसेच नियमांना डावलून रात्री उशिरापर्यंत ही कला केंद्र सुरू असल्याची चर्चा आहे. या बेकायदेशीर प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही तीव्र नाराजीच वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 (नवीन भारतीय न्याय संहिता कलम 223) अंतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर केंद्रचालकांचे धाबे दणाणले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. तो कलाकेंद्रामधील एक मुलीच्या प्रेमात अडकला होता. तिचा दुरावा सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर वाशी तालुक्यातील वादग्रस्त तुळजाई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन सजग झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.