Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरणार म्हणजे काय? मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?

प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरणार म्हणजे काय?  मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?

मुंबई : खरा पंचनामा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकारवर प्रचंड दबाव आला असून, सरकार लवकरच यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दुपारी ३ वाजता होणाऱ्या कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार असून, यात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरता येईल का, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्रभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून, आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत आहे. काल मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांना आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी जाण्यास मनाई केली आणि अटींचे पालन करण्याचे आदेश दिले. यामुळे सरकारवर देखील तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे. विशेष पोलीस निरीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी विखे पाटलांची भेट घेतली असून, सरकार नव्या जीआरच्या तयारीत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. राज्यभरात कुणबी नोंदी सापडल्या असल्या, तरी त्यात व्यक्तींची नावे नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच आहे. सुप्रीम कोर्टानेही मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधता येणार नाही, असा निर्णय दिल्याने हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. हैदराबाद गॅझेटच्या मागणीवरून जरांगे पाटील यांनी आग्रह धरला आहे, परंतु गॅझेटमध्ये फक्त लोकसंख्येचा उल्लेख असून व्यक्तींची नावे नसल्याने हा मुद्दा उपसमितीसमोर चर्चेत आहे.

कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार नवीन ड्राफ्ट तयार करत आहे. यात गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींचे प्रत प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरता येईल का, यावर विचारविनिमय सुरू आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे कुणबी असल्याचा पुरावा किंवा नोंद नसेल तर नातेवाई किंवा गावातील समान आडनावाच्या कुणबी व्यक्तींचे प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत अंतिम निर्णय उपसमितीच्या बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे जास्तीत जास्त मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल, असा सरकारचा प्रयत्न आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.