"रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो, आता अभिमानाने त्रास सहन करू"
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आरक्षणासाठी सातत्याने सरकारविरोधात लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील हे गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समुदायातील लोक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच मराठा आंदोलक दक्षिण मुंबईत भटकंती करत असल्याचं, वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. आंदोलनाचा अधिकार असला तरी मराठा आंदोलकांना त्यांच्या वैधानिक मागणीसाठी मुंबई ठप्प करण्याचा, मुंबईकरांची गैरसोय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी (१ सप्टेंबर) संताप व्यक्त केला. विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मुंबईकरांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते, पदपथ, रेल्वे व बस स्थानकं मोकळी आणि स्वच्छ करण्यास सांगितलं आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर आंदोलकांनी आझाद मैदानवगळता मुंबई रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलकांनी आता खारघरची (नवी मुंबई) वाट धरली आहे. कारण न्यायालय व प्रशासनाने मराठा आंदोलकांना खारघरमध्ये आंदोलन करण्याची परवानी दिली आहे. दरम्यान, या आंदोलनाला विरोध करणारे, तसेच सरकारमधील लोक व उच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप नोंदवला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की "रोज आपण परप्रांतीयांची गर्दी सहन करतो, मात्र आज आपला मराठी बांधव मुंबईत आला तर त्यांचा थोडासा त्रास अभिमानाने सहन करू.
अविनाश जाधव यांनी फेसबूकवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की "मुंबईकर रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो. आता आपले हक्काचे मराठी भाषिक आले आहेत, तर त्यात वावगं काय आहे? थोडासा त्रास झाला तरी अभिमानाने सहन करू, आमचे राज ठाकरे नेहमीच सांगतात, मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे!"
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.