नर्तकी पूजा गायकवाडचा तुरुंगातला मुक्काम वाढला
उपसरपंच आत्महत्या प्रकरण
बार्शी : खरा पंचनामा
बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळत आहे. कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज बार्शी येथील न्यायालयात तिला हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पूजाची आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्याचा आदेश दिला. यापूर्वी न्यायालयाने तिला 3 दिवसांची कोठडी सुनावली होती.
गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाची चौकशी अद्याप निर्णायक टप्प्यात पोहोचलेली नाही. पोलिसांनी न्यायालयात मांडलेल्या माहितीनुसार, गोविंद यांनी आत्महत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कुठून आणि कसे आणले, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. तसेच, पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यातील आर्थिक व्यवहार, तसेच वैराग येथे पूजाच्या नावावर असलेला प्लॉट कसा खरेदी करण्यात आला, याचाही सखोल तपास करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या प्लॉटसाठी गोविंद बर्गे स्वतः साक्षीदार राहिले होते. या सर्व बाबींचा तपास शिल्लक असल्याने पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.
गोविंद बर्गे हा गेवराई तालुक्यातील पारगाव गावचा युवक आणि माजी उपसरपंच होता. काही काळापूर्वी तो कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडच्या प्रेमात पडला होता. प्रेमाच्या नात्यातून गोविंदने पूजाचे अनेक हट्ट पूर्ण केले होते. तिला महागडे मोबाईल, सोने, पैसा, तसेच एक प्लॉटही खरेदी करून दिला होता. मात्र, यानंतरही पूजाला आणखी वैभव हवे होते. विशेष म्हणजे, गेवराई शहरातील एक अलिशान घर देखील तिला मिळावे, अशी मागणी होत होती. या कारणामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होत गेले.
नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, आधीचे प्रेम आणि नंतर निर्माण झालेल्या तणावामुळेच गोविंद बर्गेने आत्महत्या केली. मात्र, या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी समोर येत आहेत. गोविंदकडे बंदूकच नव्हती, मग त्याने आत्महत्येसाठी पिस्तूल कसे वापरले? या प्रश्नाने संपूर्ण प्रकरणावर शंका उपस्थित केली आहे. गोविंदच्या भाच्याने माध्यमांशी बोलताना "हे घातपाताचे प्रकरण आहे" असा ठाम दावा केला.
सध्या वैराग पोलीस या घटनेमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असून, पूजाच्या वाढीव कोठडीमुळे तपासाला अधिक गती मिळणार आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील गूढ उलगडण्याची अपेक्षा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.