ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला; तिघे जेरबंद
दौंड : खरा पंचनामा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. नगर-दौंड महामार्गावरील हॉटेल सारंगजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात गाड्यांची काच फुटली असून एका कार्यकर्त्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे नियोजित कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव शिवारात हल्ला झाला होता. अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
'हा हल्ला कोणी केला हे मला माहिती नाही. पण आमच्या दोन गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. गाडीत असलेला एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. याआधी माझ्यावर सात-आठ वेळा हल्ले झालेले आहेत. मी पोलिसांना देखील आधीच सांगितले होते. पण आता मी काही बोलणार नाही. सरकारला आम्ही वारंवार सांगितले, आता बोलून काही उपयोग नाही', अशी उद्विग्न प्रतिक्रिया हाके यांनी दिली.
लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.